आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट:

प्राचीन काळात कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचं निवासस्थान होतं. हे दोघं साक्षात शिवशक्तीचे प्रतीक. शिव म्हणजे संहार, शांती आणि योगाचा अधिष्ठाता. तर पार्वती म्हणजे प्रकृती, माया आणि प्रेम. दोघांचं मिलन हे विश्वाचं संतुलन होतं.
एके दिवशी, भगवान शंकर कैलासावरून तपश्चर्येसाठी बाहेर गेले होते. पर्वतावर फक्त देवी पार्वती तिची सेविका होते. देवी पार्वतीने आपल्या सेविकांसह मनोहर बागेत स्नानाची तयारी केली होती.
स्नानासाठी जाताना पार्वतीला वाटलं की, स्नानगृहाच्या बाहेर कोणी विश्वासू पहारेकरी हवा, जो कुणालाही आत येऊ देणार नाही. तिच्या सेविकांवर तिला पूर्ण विश्वास होता, पण तिला स्वतःचाच एक सेवक हवा होता, जो तिच्या आज्ञेप्रमाणे कार्य करेल.
तिने स्वतः. त्या मातीपासून एक सुंदर, गोंडस मुलगा निर्माण केला. त्याच्या डोक्यावर चुटुकदार केस, चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत शौर्य होता. त्याचं नाव तिने ठेवलं — गणेश.
ती म्हणाली,

“गणेशा, तू माझा मुलगा आहेस. मी स्नान करत असताना, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. जरी कोणी देवसुद्धा आला, तरी त्याला थांबव.”
गणेशाने आईच्या आज्ञेला आपलं धर्म मानलं.
तेवढ्यात भगवान शंकर तपश्चर्या संपवून परत आले. त्यांना स्नानगृहाजवळ एक अनोळखी मुलगा दिसला. शंकर पुढे जाताच गणेशाने हात पुढे करत तेथून परत जावं असं सांगितलं.
शंकर हसले. त्यांना वाटलं, “हा कोण मुलगा, जो मलाच अडवत आहे?” त्यांनी सौम्य शब्दात सांगितलं की, “मी पार्वतीचा पती आहे. मला आत जाऊ दे.”
पण गणेशाने नकार दिला. त्याने स्पष्ट सांगितलं —
“माझ्या आईच्या आज्ञेप्रमाणे कोणालाही आत जाऊ देणार नाही!”
शंकर रागावले. त्यांनी आपल्या गणांना बोलावलं. नंदी, भृंगी, कार्तिकेय, आणि इतर अनेक देवतांनी गणेशाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण गणेश आईच्या आज्ञेला पाठीशी घालून उभा होता.
महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते. त्यांनी क्रोधीत होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात, सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे.
त्वरेने सारे देव, ब्रह्मा, विष्णु स्वतः हजर झाले. त्यांनीसुद्धा गणेशाची समजुत काढली. पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता.
महादेवाचं क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशुल गणेशावर फेकले, एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडुन दिसेनासे झाले.
शंकर त्याला ओलांडुन आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली. आणि समोर तिचा मुलगा मृत अवस्थेत पाहिला. ती वेडी झाली. रडू लागली, कापू लागली, आणि तिचा क्रोध इतका वाढला की साऱ्या ब्रह्मांडाला हादरवून टाकणारी काळी रूप प्रकट झाली.
ती म्हणाली —
“जर माझ्या मुलाला परत जिवंत केलं नाही, तर मी या संपूर्ण सृष्टीचा विनाश करीन!”
सर्व देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. शंकराला आपली चूक लक्षात आली. ते खूप पश्चातापाने म्हणाले:
“हे देवी! मी गणेशाला ओळखलं नाही. मला क्षमा कर.
तिने शंकराला आणि उपस्थित सर्वाना जाब विचारला. “गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता. आणि त्याने हे तुम्हा सर्वाना सांगुनही तुम्ही त्याला मारलंत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात? काय चुक होती त्याची?”
शंकर आता नरमले होते. “देवी, आम्हाला क्षमा कर. आम्हाला गणेशबद्दल माहित नव्हते. तो माझी वाट अडवुन बसला होता त्यामुळे मी क्रोधीत झालो.” मी त्याला पुन्हा जीव देईन.”
शंकराने आपल्या गणांना आज्ञा दिली:
“ज्या प्राण्याचं डोकं उत्तरेच्या दिशेला ठेवलेलं सापडेल, ते लगेच आणा.”
गण शोध घेऊन परत आले — तो म्हणजे बाल हत्ती
शंकरांनी ते हत्तीचं डोकं कापून आणलं आणि पार्वतीच्या मुलाच्या शरीरावर बसवलं. त्यानंतर शंकरांनी आपल्या मंत्रशक्तीने त्या बालकाला पुन्हा जीवन दिलं.
शंकराने पुढे साऱ्या देवांपुढे घोषणा केली:
“हा माझा आणि पार्वतीचा पुत्र आता ‘गणाध्यक्ष’ ठरेल.
सर्व देवांपेक्षा आधी याची पूजा केली जाईल.
तो विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) आणि बुद्धीचा देवता ठरेल.”
सर्व देवांनी आनंदाने स्वीकारलं. ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला की, “जिथे श्रीगणेशाची पूजा असेल, तिथे यश, सुख, आणि बुद्धी नांदेल.”
त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणुन त्याचे एक नाव प्रथमेश आहे.
गजाचे आनन म्हणजे शीर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव आहे.
गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती हि नावे आहेत.
आजही कोणतंही शुभकार्य असो – लग्न, घराची पूजा, व्यवसायाची सुरुवात – श्रीगणेशाची पूजा सर्वप्रथम केली जाते.
कारण तो विघ्नहर्ता, सिद्धिदाता, आणि बुद्धीवंत आहे.
त्याचा जन्म अडथळ्यांवर मात करून, त्यागातून, भक्तीतून आणि प्रेमातून झाला आहे.
अशा या गणपतीची बाप्पाच्या जन्माची हि विलक्षण कथा आहे.
जय श्री गणेशा!
“वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटिसमप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ||”
